खेळाडू तयार, मैदान सज्ज…आता फक्त सर्व्हिस आणि स्मॅशचा थरार बाकी!
महाराष्ट्रातील दमदार खेळाडू उरूण-ईश्वरपूरच्या मैदानावर भिडणार!
राजारामबापू क्रीडानगरी सज्ज… ‘द फोक आख्यान’नंतर आता ‘द गेम’ची रंगत
२३ पुरुष आणि २० महिला संघांचा सहभाग, राज्यभरातील सर्वोत्तम खेळाडू दाखवणार कौशल्य
सांगली । महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उरुण-ईश्वरपूर येथे आयोजन केलेले आहे. ही स्पर्धा पोलीस परेड मैदानावरील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडानगरीत गुरुवार दि. १३ ते रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ अशी चार दिवस होणार आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन तसेच सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातील पुरुषांचे २३ संघ तर महिलांचे २० संघ तसेच प्रशिक्षक, पंच व संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यापूर्वी आपल्या शहरात १९८३, १९८७,१९९५ व २००३ साली खुल्या गटाच्या राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेले आहे. तसेच २०२२ मध्ये आपण आयोजित केलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा पाहण्याची संधी परिसरातील क्रीडा रसिकांना मिळाली. या राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख तसेच अनुभवी खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळणार आहे.
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून जानेवारी २०२६ मध्ये वाराणसी, उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या ७२ व्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे.
आपल्या तालुक्यातील, जिल्हयातील, महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही स्पर्धा आपल्या तालुक्यासह जिल्हयातील क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
उरुण-ईश्वरपूर शहर हे व्हॉलीबॉल खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरास व सांगली जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळास मोठी परंपरा व इतिहास आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दैदीप्यमान खेळ करून जिल्ह्याचा मोठा नावलौकिक केलेला आहे. व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून या शहरासह वाळवा तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना विविध पदावर व नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. पोलीस परेड मैदानावर चार मैदाने तयार करण्यात येत आहेत. या सर्व मैदानावर दिवस-रात्रीचे सामने खेळविण्यासाठी प्रकाश झोताची व्यवस्था करीत आहोत. मैदानाच्या पश्चिम बाजूला व्यासपीठ उभारून दक्षिण, उत्तर व पूर्व बाजूला साधारण ५ हजार क्रीडा प्रेमींना बसण्यासाठी गॅलरीच्या व्यवस्था करीत आहोत. मुख्य प्रवेशद्वार पूर्व बाजूला असून पोलीस स्टेशनच्या बाहेरील बाजूस वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हा सचिव प्रा.डॉ.संदीप पाटील, उपाध्यक्ष मोहन पाटील (भिलवडी), शिवछत्रपती पुरस्कार विजेते पोपट पाटील (सर), जिल्हा सदस्य राजेंद्र सातपुते (ईश्वरपूर), प्रकाश पाटील, श्रीकांत पाटील (येलूर) यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.













































































